स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याचा अपमान — जालन्यात आंदोलनकर्त्यावर पोलिसांची लाथ”
महिला संवाद
जालना | तरंग कांबळे
देश स्वातंत्र्याच्या ७९व्या वर्षात पाऊल टाकत असताना, जालना जिल्ह्यात पोलिसांच्या वर्दीखालील असंवेदनशील चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, न्यायाच्या शोधात गेल्या महिनाभर उपोषण करत असलेल्या आंदोलनकर्त्याला, तेही मंत्र्यांना भेटण्याच्या प्रयत्नात असताना, पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी अक्षरशः फिल्मी स्टाईलने कमरेत लाथ घालून पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
काय घडलं?
अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे दोन उपोषणकर्ते कौटुंबिक वादात न्याय मिळावा या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यात आलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताफ्याला भेटून आपली व्यथा सांगण्यासाठी ते पुढे सरसावले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या एका आंदोलनकर्त्याच्या कमरेत, डीवायएसपी कुलकर्णी धावत जाऊन जोरदार लाथ घालताना कॅमेऱ्यात कैद झाले.
प्रश्न फक्त एका लाथेचा नाही…
ही घटना केवळ एका आंदोलनकर्त्याला मारहाणीची नाही, तर राज्याच्या पोलिस दलाच्या शपथेची, वर्दीच्या सन्मानाची आणि माणुसकीच्या तत्त्वांची उघडपणे पायमल्ली आहे. आज कुसुमाग्रज असते, तर कदाचित ते पुन्हा एकदा “स्वातंत्र्यदेवीला विनवणी” करणारी कविता लिहिली असती —
“या देशात माणुसकीला स्वातंत्र्य केव्हा मिळणार?”
तर नामदेव ढसाळ असते, तर त्यांनी कदाचित डीवायएसपी कुलकर्णींची तुलना ब्रिटिश राजवटीतील जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांशी केली असती, आणि थेट सवाल केला असता —
“गृहमंत्र्यांनो, अशा लाथा तुमच्या पोलिस मॅन्युअलचा भाग आहेत का?”
जनतेचा सवाल – न्याय कुठे?
राज्य शासन, पोलिस महासंचालक आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून, संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, ही जनतेची मागणी आहे. कारण जर वर्दीवर बसलेल्या माणुसकीच्या शिक्क्याला अशा “लाथा” लागल्या, तर न्यायव्यवस्था आणि लोकशाही दोन्हीच्या पाया हलतील, यात शंका नाही.