कीर्ती लंगडेच्या ‘अंतरीची ठेव’ काव्यसंग्रहास उज्जैनकर पुरस्कार
कळमेश्वर येथील सुप्रसिद्ध कवयित्री कीर्ती लंगडे हिच्या ‘अंतरीची ठेव’ या काव्यसंग्रहास नुकताच आळंदी येथील उज्जैनकर फाऊंडेशनचा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
कीर्ती लंगडे यांचे विविध विषयावरील लेख, कविता, समीक्षा वृत्तपत्रातून, मासिकातून, दिवाळी अंकातून सातत्याने प्रकाशित होत असतात. त्यांचा ‘अंतरीची ठेव’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्यांच्या अनेक कवितांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कवितासंग्रहात शब्द, आशय, प्रचिती यांचा मेळ साधला असून मानवी भावभावनांचे मार्मिक चित्रण मांडले आहेत.
उज्जैनकर फाउंडेशनतर्फे१४ डिसेंबर २०२४ ला ‘आळंदी देवाची’ येथे होऊ घातलेल्या राज्यस्तरीय शिव बाल, किशोर, युवा मराठी साहित्य संमेलनात कीर्ती लंगडेला पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.
यानिमित्ताने ज्येष्ठ कवी, लेखक, समीक्षक प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’, कविवर्य गणेश भाकरे, प्रताप वाघमारे, वसंत सोनुले, डॉ. स्मिता मेहेत्रे, अक्षरक्रांती फाऊंडेशनचे अध्यक्ष शंकर घोरसे, एकनाथ रावळ महाराज, शोभा कऊटकर, शीतल कांडलकर, कवी ‘मुक्तविहारी’, लीलाधर दवंडे, विजय वासाडे, निशा खापरे, रेखा सोनारे, इतर साहित्यिक व मित्रमंडळीनी कीर्ती लंगडेचे अभिनंदन केले आहे.