डॉ. संजय लाखे पाटील यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश
जालना (महिला संवाद) ः काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थिती शुक्रवारी शिवसेनेत (ठाकरे गट) जाहिर प्रवेश केला.
यावेळी विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते अंंबादास दानवे, माजी खासदार तथा ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, रमेश पाटील गव्हाड, लक्ष्मण वडले यांची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांसह सोशल मिडियावर चर्चेला आल्या होत्या. डॉ. लाखे पाटील हे अभ्यासू व्यक्तीमत्व असून, दुष्काळ, शेती, सिंचन, आपत्ती व्यवस्थापन यासह विविध विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. दुष्काळ, आपत्तीव्यवस्थापन या विषयांवर त्यांनी न्यायालयीन लढाई देखील लढलेली आहे. एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो धसास लावल्याशिवाय स्वस्त न बसणे हा डॉ. लाखे पाटील यांचा स्थायी भाव आहे. दुष्काळाचे निकष आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबतची बदलण्यास लाखे पाटील यांनी केंद्र सरकारला भाग पाडले आहे.
काँग्रेस पक्षात होणारी घुसमट आणि अंतर्गत वादाला कंटाळून अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. डॉ. लाखे पाटील यांनी काँग्रेस पक्षात आतापर्यंत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेतही त्यांची राजकीय कारकीर्द आणखी जोमाने सुरू राहील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटत आहे.
आपण मुख्यमंत्री असतांना डॉ. संजय लाखे पाटील यांच्याशी मराठा आरक्षणासह विविध विकास कामांच्या मुद्यांवर चर्चा झाली. डॉ. लाखे पाटील हे अभ्यासू व्यक्तीमत्व असल्याचे त्यांचवेळी आपल्या निदर्शनास आले होते. आज त्यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश होत असल्याने मनस्वी आनंद होत आहे.
उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचे सुत्रे घेतल्यानंतर महाविकास आघाडीचा घटक म्हणून अनेकदा त्यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांच्या रूपाने आदर्शवत नेतृत्व लाभल्याने राज्य विकासाच्या वाटेवर घोडदौड करत राहीले. त्यांच्या विचाराने प्रभावीत होवून आज आपण शिवसेनेत प्रवेश करत आहे. एक शिवसैनिक म्हणून आपण काम करत राहणार असून पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पुर्ण निष्ठेने पार पाडू अशी प्रतिक्रिया डॉ. संजय लाखे पाटील यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करतेवेळी दिली.