जालना लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया
पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज
सर्व मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन
मतदान करावे — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
13 मे रोजी सकाळी 7 ते सांय. 6 पर्यंत मतदानाचा कालावधी
जालना, दि. 11 (जिमाका) :- जालना लोकसभा मतदासंघात सोमवार, दि. 13 मे रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदान करावे. आपल्या परिसरातील सर्व मतदारांनाही मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे आदी यावेळी उपस्थित होते.
जालना लोकसभा मतदारसंघात जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, पैठण या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघाकरीता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदारसंघात एकूण मतदान केंद्र 2 हजार 61 आहे. मतदारांची संख्या 19 लाख 67 हजार 574 आहे. महिला अधिकारी संचलित मतदान केंद्रांची संख्या 7 आहे. दिव्यांग अधिकारी संचलित मतदान केंद्रांची संख्या 6 आहे. तरुण अधिकारी संचलित मतदान केंद्रांची संख्या 8 आहे. वेब कास्टींग करण्यात येणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या 1 हजार 36 आहे. मतदान केंद्रांवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या मशिनची संख्या सीयु-2061, बीयु – 4122, व्हीव्हीपॅट-2061, राखीव मशिनची संख्या सीयु-594, बीयु – 819, व्हीव्हीपॅट-757 आहे. मतदानाच्यादृष्टीने मतदारसंघातील सर्व तयारी पूर्ण झाली असून, प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, सुरक्षा व्यवस्था, उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे, मतदान केंद्रावर बैठकव्यवस्था, उन्हाळा लक्षात घेता शेड आदी सुविधांची पूर्तताही करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. पांचाळ यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी सुरक्षा विषयक माहिती दिली. मतदानासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध असून बाहेरुन जिल्हयातूनही पोलीसांची कुमक मागविण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. मतदान सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी स्वीप अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीची माहिती दिली.
***