- 18-जालना लोकसभा मतदार संघ
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मतमोजणी केंद्राची केली पाहणी
18-जालना लोकसभा मतदारसंघमतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
जालना, दि. 1 (जिमाका)– जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवार, दि. 4 जून 2024 रोजी जालना येथील एमआयडीसीतील सरस्वती अॅटो कम्पोनन्टस प्रा.लि. येथे मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. आज त्यांनी मतमोजणी केंद्रातील सर्व व्यवस्थेची पाहणी करून मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
दि. 4 जून रोजी प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी 8 वाजता प्रारंभ होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मतमोजणी करण्यात येणार आहे.
मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयार केली आहे. सुमारे 1300 कर्मचाऱ्यांचा मतमोजणी प्रक्रियेत सहभाग राहणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 अशा एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. तर पोस्टल मतदान पत्रिकेसाठी एकूण 10 टेबल असणार आहेत.
जालना लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, दि. 13 मे 2024 रोजी मतदान पार पडले. जालना मतदार संघात जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या सर्व मतदारसंघातील एकूण 2 हजार 61 मतदान केंद्रांवर सुमारे 13 लाख 61 हजार 226 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक रिंगणात 26 उमेदवार आहेत.
मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या फेऱ्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. जालना- 24 फेऱ्या तर मतदान केंद्रांची संख्या 329, बदनापूर- 26 फेऱ्या तर मतदान केंद्रांची संख्या 358, भोकरदन-24 फेऱ्या तर मतदान केंद्रांची संख्या 329, सिल्लोड-26 फेऱ्या तर मतदान केंद्रांची संख्या 356, फुलंब्री- 26 फेऱ्या तर मतदान केंद्रांची संख्या 355, पैठण- 24 फेऱ्या तर मतदान केंद्रांची संख्या 334 आहे.
नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असून आतील व्यवस्था ही केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे असून त्याबाहेरील सुरक्षा राज्य राखीव पोलीस दलाकडे व बाह्य व्यवस्था राज्य पोलीस दलाकडे आहे. याशिवाय संपूर्ण सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी होत आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईलसह जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय स्वतंत्र मिडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचविली जाणार आहे.