Mahila Sanvad News in Jalna

मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन.

मुख्यमंत्री वयोश्री योजना

ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन

जालना, दि. 8 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागु केली आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांनी योजनेचा अर्ज व अधिक माहिती मिळण्यासाठी समाज कल्याण जालना या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतंर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक असमर्थता व दुर्लभतेनूसार सहायभूत साधने उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरीता एकवेळ एकरकमी 3 हजार रूपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सदर अर्थसहाय्य लाभार्थ्यांच्या बँकेतील आधारसंलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण प्रणालीव्दारे प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ दि. 31 डिसेंबर, 2023 रोजी वयाची 65 वर्षे पुर्ण केलेल्या व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लागु आहे. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबधित ज्येष्ठ नागरीकाच्या कुटूंबाचे मागिल वर्षातील वार्षिक उत्पन्न रूपये दोन लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ मंजूर करण्यासाठी ग्रामीण भागाकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *