जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करावेत
जालना, दि. 24 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शनिवार दि.18 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सेवा केंद्रावरुन किंवा इतर ठिकाणावरुन ऑनलाईन अर्ज दि.16 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सादर करावेत, असे आवाहन अंबा-परतूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.जी. पवार यांनी केले आहे.
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2025 साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी पाचवीच्या मुख्याध्यापकांकडून प्रमाणपत्र भरुन घ्यावे, तसेच प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी व पालकांची स्वाक्षरी करुन हे प्रमाणपत्र मुख्याध्यापकाद्वारे प्रमाणित करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करणे, जाहिरात, माहितीपत्रक, प्रमाणपत्र आदि www.navodaya.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी प्रमाणपत्र, छायाचित्र, स्वाक्षरी 10 ते 100 केबीमध्ये स्कॅन करुन भरावेत. विद्यार्थ्यांचा जन्म दि.1 मे 2013 ते 31 जुलै 2015 या कालावधीमधील असावा. जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व इयत्ता पाचवी वर्गात वर्ष 2024-25 मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे. असे प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, अंबा-परतूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.