राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण पथकाची शहरात कारवाई
जालना, दि.3 (जिमाका) : शहरातील विविध ठिकाणी अवैधरित्या गुटखा, तंबाखु, मावा, जर्दा, खर्रा आणि सुट्टे सिगारेट इत्यादींची विक्री करणाऱ्या तसेच तंबाखु नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व पान टपरीधारकांवर कोटपा-2003 कायद्यातंर्गत जिल्हा तंबाखु नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे छापे टाकण्यात आले. कोटपा कायद्याअंतर्गत एकुण 17 पानटपरीवर कारवाई करुन 4 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, अतिजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पानटपरी धारकांनी अवैधरित्या कुठल्याही तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करु नये, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.