अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी सुरेश पाचकवडे यांची निवड
नागपूर : अक्षरक्रांती फाऊंडेशन व कला गौरव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर रेशीमबाग येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात शनिवार २८ व रविवार २९ डिसेंबर २०२४ रोजी दोन दिवसीय साहित्य महोत्सव आयोजित करण्यात आलेला असून या साहित्य महोत्सवाचे अध्यक्षपद अकोला येथील ज्येष्ठ साहित्यिक मा. सुरेश पाचकवडे भूषविणार आहेत.
मा. पाचकवडे यांनी यापूर्वी ३७ व्या अंकुर साहित्य संमेलनासह सृजन साहित्य संमेलनाचे सुध्दा अध्यक्षपद भूषविले आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या वाड्.मय पुरस्काराने व अनेक साहित्य पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. तीन कथासंग्रह व दोन कवितासंग्रह त्याचे नावे आहेत. दोन्ही आयोजक संस्थांची संयुक्त बैठक सावनेर येथील राम गणेश गडकरी यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. अनेक ज्येष्ठ मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत सर्वानुमते मा. सुरेश पाचकवडे यांच्या नावावर एकमत होऊन अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
सदर आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात उदघाटन व समारोप सत्रासह एकूण १० सत्र असणार आहेत. त्यात जपान येथील सुप्रसिद्ध साहित्यिका मा. उर्मिला देवेन तथा अबुधाबी (युएई) येथील कवी मा. मनोज भारशंकर सहभागी होत आहे. साहित्य महोत्सवात महाराष्ट्रसह देशाच्या इतर राज्यातील नामवंत साहित्यिक या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात सहभागी होत आहेत. सदर महोत्सवात गझल संमेलन, कथाकथन, परिसंवाद, चर्चासत्र, वऱ्हाडी कवी संमेलन, प्रकट मुलाखत, कवयित्रींचे कवीसंमेलन, निमंत्रितांचे कविसंमेलन अशी दोन दिवस भरपूर साहित्यिक मेजवानी असणार आहे.
साहित्य महोत्सवाच्या निमित्ताने स्मरणिका व पुस्तक प्रकाशन होत आहे; असे महोत्सवाचे आयोजक अक्षरक्रांती फाऊंडेशनचे अध्यक्ष शंकर घोरसे तथा कला गौरव संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता मानेकर-बानाईत यांनी कळविले आहे.
सदर बैठकीला ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’, कवी गणेश भाकरे, संजय टेंभेकर, संपादक गोपाल कडूकर, प्रकाशक सचिन सुकलकर, बाबा निमजे, सैयद अमीन, विजय वासाडे, देवेंद्र काटे, मोहन सोमलकर, कमलाकर चौधरी, भागवतराव बानाईत, हितेश गोमासे, शीतल बोढे, प्रणाली डहाट, निकिता डहाट, धनश्री पाटील, आदी मान्यवर प्रामुख्याने हजर होते.