खाजगी तसेच सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध
जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक-2024 साठीचा कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधीत जागा मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे आदी करीता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकाच्या परवानगी शिवाय व संबंधित परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध घालणे आवश्यक झाले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये खाजगी व सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.