उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्याच्या कार्यपध्दतीचे आदेश जारी …
जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगानेविधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूकीच्या कालावधीत जालना जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकांपासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटार गाड्या, वाहने यांचा समावेश नसावा. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील. या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. आदेश दि. 15 ऑक्टोबर रोजीचे 6 वाजेपासुन ते दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजीचे 24 वाजेपर्यंत संपूर्ण जालना जिल्ह्यात अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.