Mahila Sanvad News in Jalna
राजकीय दबावाखाली केलेली स्थानबद्धता उच्च न्यायालयाकडून रद्द ..

जालना जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांचे न्यायालयाने टोचले कान

जालना (प्रतिनिधी): राजकीय वैमनस्यातून आमदार नारायण कुचे यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा गैरवापर करत भाचा दीपक लक्ष्मण डोंगरे यावर वारंवार खोटे गुन्हे दाखल केले. शिवाय याच गुन्ह्याचा आधार घेत एमपीडीए नुसार कारवाई करत एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले होते. ही कारवाई करताना पोलीस प्रशासनावर दबाव आणून गैर मार्गाने एमपीडीए कारवाई करत भाचा दीपक डोंगरे यास हरसुल कारागृहात ठेवल्याचा आरोप दीपक डोंगरे यांनी केला. मात्र याच प्रकरणात न्यायव्यवस्थेने मला न्याय दिला असून उच्च न्यायालयाने माझी याचिका मंजूर करत माझी या गैरप्रकारे झालेल्या एमपीडीए कारवाईतून मुक्तता केली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपक डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली..
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सामाजिक कार्यकर्ते दीपक डोंगरे हे भाजपा आमदार नारायण कुचे यांचे भाचे आहेत. या दोघांमध्ये गेल्या काही वर्षापासून राजकीय वाद आहेत. मात्र नारायण कुचे यांनी वारंवार पोलिसांना आणि लोकांना हाताशी धरून दीपक डोंगरे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने दीपक डोंगरे यांना जामीन देखील दिलेला आहे. मात्र अशाच प्रकारच्या खोट्या गुन्ह्यांचा आधार घेत आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय नुकसान होऊ नये याकरिता नारायण कुचे यांनी दीपक डोंगरे यांना एमपीडीए कारवाईत अडकवण्याचे षडयंत्र रचले. जालना पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा वापर करत गैरप्रकारे एमपीडीए कारवाई करत भाचा दीपक डोंगरे यास हरसुल कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध केले होते. मात्र या प्रकरणात दीपक डोंगरे यांनी उच्च न्यायालयात दाद मागत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर येथील खंडपीठात याचिका दाखल केली होती. ही याचिका मंजूर करत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचे कान टोचले आहेत. आणि याच प्रकरणात दीपक डोंगरे यांची एमपीडीए कारवाईतून मुक्तता करत दीपक डोंगरे यांची याचिका मंजूर केली आहे. मात्र अशा प्रकारे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून सर्वसामान्य तरुणांचे आयुष्य उध्वस्त करत असल्याने जनतेने न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विशेष म्हणजे ही एमपीडीए कारवाई करताना तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ आणि त्यांच्या टीमने सामाजिक कार्यकर्ते दीपक डोंगरे यांना पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या वारीतून उचलून आणले होते.  नेहमी एमपीडीए कारवाई केल्यानंतर प्रेस नोट काढून पत्रकारांना माहिती दिली जाते. मात्र दीपक डोंगरे यांच्यावर केलेल्या कारवाईची माहिती हेतूपुरस्सर माध्यमापासून लपवली गेली होती. माध्यम प्रतिनिधी प्रश्न उपस्थित करतील याची जाणीव पोलीस प्रशासनाला होती. तरीही पोलीस प्रशासनाने अशाप्रकारे बेकायदा कारवाई करून मला आमदार नारायण कुचे यांच्या सांगण्यावरून जेलमध्ये ठेवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक डोंगरे यांनी केला.
राजकीय लाभापोटी आ. नारायण कुचे काहीही करू शकतात
मला राजकीय जीवनातून उठवण्यासाठी आणि स्वतःचा पराभव दूर करण्यासाठी आमदार नारायण कुचे काहीही करू शकतात. सध्या मला अनेक नवीन नंबर वरून कॉल येत असून भेटण्यासाठी बोलावण्यात येत आहे. शिवाय धमकवल्याही जात आहे. मी या प्रकरणात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे नुकतीच तक्रार देखील केली आहे. नारायण कुचे माझ्यावर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करू शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात माझ्या विरोधात तक्रार आल्यास मला बोलावून शहानिशा करावी अशी विनंती देखील मी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *