चंदनझीरा अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी नागरीकांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मा.राज्यपालांना निवेदन…
निवेदनाद्वारे केल्या विविध मागण्या..
चंदनझीरा येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी दि.18 शुक्रवार रोजी दुपारी एक वा.च्या सुमारास नागरीकांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मा.राज्यपाल यांना पाठवण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, चंदनझिरा ही वस्ती मागील ४५ वर्षा पासून बसलेली असून या वस्ती मध्ये सर्व जालना एम.आय.डी.सी. मध्ये काम करणारे मोल मजूरी करुन राहाणारे लोक राहातात. एम.आय.डी.सी. असल्यामुळे तेथे पर राज्यातूनही पोट भरण्यासाठी मजूर राहातात. दिनाक १३.१०.२०२४ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास चंदनझीरा येथील नऊ वर्षीय चिमुकलीवर १९ वर्षाच्या नराधमाने बलात्कार करुन तिचा जिव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या आरोपीला पोलिसानी पकडलेले असून तो आज रोजी पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपी हा सवर्ण समाजातील असल्याने त्याला स्थानिक नेते तसेच पोलिस प्रशासनातील काही अधिकारी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनाद्वारे मा.राज्यपाल यांच्याकडे पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या.
१. सदर आरोपीचे दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात पाठवण्यात यावे असे निर्देश मा. पोलिस अधिक्षक जालना यांना देण्यात यावेत.
२. सदर आरोपीचे केस ही जलद न्यायालयात चालवून आरोपीस फासीची शिक्षा देण्यात यावी.
३. चंदनझिरा परिसर तसेच इतर ही जालना जिल्हयातील झोपडपट्टी मध्ये चालत असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावेत.
४. चंदनझिरा परिसर तसेच जालन्यातील इतरही भागातील शाळेच्या समोर दामीनी पथक यांची नियुक्ती करण्यात यावी.
अशा मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मा.राज्यपाल यांना पाठवण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनावर अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.