एक ऋणानुबंध..
एका पावसाळी रात्री, एक तांबड्या रंगाची कुत्री, आपल्या एका पिलाला घेऊन आमच्या दाराशी आली. खूप पाऊस पडत असल्यामुळे आणि लहान पिल्लू सोबत असल्यामुळे आम्ही तिला कंपाउंडमध्ये घेतलं. कोमट दूध दिलं. ही कुत्री आणि ते पिल्लू आमच्या कंपाउंडमध्ये राहायला लागलं. तेव्हा आमच्या घराचा खालचा मजल्यावरचा हॉल गोडाऊनसाठी भाड्याने दिलेला होता. ते पिल्लू त्या हॉलमध्ये शि-सू करायला लागलं ; त्यामुळे त्या भाडेकरूनी त्या पिल्लाला कुठेतरी नेऊन सोडलं. त्यावेळी प्रणव, आमचा मुलगा नेमका नागपुरात होता. तो लहानपणापासूनच नाटकात काम करायचा. रात्री उशिरा नाटकाची तालीम संपवून परत आल्यावर, त्याने त्या कुत्र्याच्या पिलाबद्दल चौकशी केली. भाडेकरूने पिल्लाला दूर नेऊन सोडले होते, हे आम्हाला माहीत नव्हते. आम्ही अंदाज बांधला. रात्री एक ते तीन आम्ही पिल्लाला शोधले. रघुजीनगरच्या प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक गाडीखाली वाकून पाहिले. पिल्लू काही सापडले नाही. त्या पिल्याची आई कमालीची अस्वस्थ होती. प्रणव म्हणाला,” आई, मी हरवलो तर तुला कसे वाटेल?” हे शब्द मला खूपच बोचले.
पुढे त्या पिल्लाची आई आमच्या गल्लीतच राहायला लागली. कालांतराने तिला पाच गोंडस पिल्ले झाली. गोल्डन रिट्रीव्हरचे क्रॉसब्रीड, सुरेख रंग, सुरेख फर .पण एकेक करता तिची बाळं मरू लागली. एक तर आमच्या गल्लीतच कुणाच्यातरी गाडीखाली आलं. शेवटी एकच सोनेरी रंगाचे पिल्लू आणि आईच उरले. एक दिवस आडव्या गल्लीच्या तोंडाशी आईही मेलेली आढळून आली. कुत्र्यांच्या निकराच्या भांडणात तिचा जीव गेला होता.
एकच पिल्लू पण त्याची काळजी करणारी तीन कुटुंबे होती. आमच्या अगदी समोरचं, अगदी बाजूचं आणि आमचं. आमच्या शेजारच्यांनी तर त्या पिलाला गेटच्या बाहेर विटांचं तात्पुरतं घरही बांधून दिलं होतं. एके रात्री मे महिन्यातील उन्हाळ्यात, त्या पिलाच्या किंचाळण्याचा खूप आवाज आला. त्याला साप ,विंचू किंवा कुणीतरी कीटक चावलं असावं. आम्ही तिन्ही कुटुंबं बाहेर आलो. त्याला कुणीतरी पाळायला हवं, अशी चर्चा सुरू झाली. पाळायला तर हवं, पण कोणी? असा प्रश्न पडला. शेजाऱ्यांचा कुत्रा म्हातारा होऊन नुकताच मेला होता. त्यांची जबाबदारी वाढवण्याची तयारी नव्हती.
मी त्याला “चल” म्हटलं आणि तो निमूटपणे माझ्या मागे आला. मस्त कुलरच्या थंड हवेमध्ये शांत झोपला. एकदा आला आणि आमचा दुसरा मुलगाच झाला. त्याचं प्रचंड कोडकौतुक सुरू झालं. त्याला फिरायला नेणं, व्हॅक्सिनेशन करून घेणं, अंघोळ घालणं, त्याचं नाव ठेवणं या उद्योगात आम्ही बुडून गेलो. अगदी मुलाचं कौतुक करावं तसं. आमचं असं ‘गोल्डी’पुराण आमच्या घरी सुरू झालं. त्याने इतका अपरिमित आनंद आमच्या आयुष्यात निर्माण केला की आम्ही कॉलनीत गोल्डीचे आई-बाबा म्हणून ओळखल्या जाऊ लागलो. एक मुलगी तर म्हणाली “काका, तुम्ही गोल्डीच्या घरात राहता का?”
तो आमच्यासोबत मस्त गाडीतून हिंडायचा, खिडकीतून तोंड बाहेर काढायचा. आमच्या घराच्या पाटीवरही आम्ही त्याचं लिहिलं नाव होतं. त्याच्या साडेदहा वर्षाच्या आयुष्यात, तो कुणालाही कधी चावला नाही, कोणाच्या अंगावर चढला नाही की मागे धावला नाही. त्याला थांब म्हटलं तर जागच्याजागी थांबायचा. माझा नातू इथे असताना, गोल्डीला घरात प्रवेश नव्हता. तो पोर्चमध्ये राहायचा आणि दारातून बाळाला बघायचा. बाळाला प्रेम करू द्यायचा.
एकदा प्रणवचे मावसभाऊ पाहुणे म्हणून राहायला आले. गोल्डीशी बाॅल खेळले. दुसऱ्या दिवशी ते निघून गेले, तर गोल्डी आपला घरभर तोंडात बॉल घेऊन त्यांना शोधत होता. आम्ही बाहेरगावी गेलो तर आमच्याकडे शिकणारी मुलं त्याची काळजी घ्यायची. आम्ही गावाला गेल्यावर तो दोन-तीन दिवस जेवत नसे, इतकं तो प्रेम आमच्यावर करीत असे. आमच्या बाजूला पाळण्यावर येऊन बसत असे आणि आम्ही हात फिरवावं अशी अपेक्षा करीत असे, पंजाने स्पर्श करून जबरदस्तीने आमच्याकडून प्रेम करून घेत असे. त्याला सुंदर फुलं खूप आवडायची. आवडलेल्या गोष्टी तो आपल्या टबमध्ये नेऊन ठेवायचा.
कारमधून फिरताना आपली गल्ली आली की आनंदाने भुंकायचा. जरा लांबून दुसऱ्या गल्लीत नेलं तर त्याला वाटायचं, आम्ही घरचा रस्ता विसरलो की काय? मग रागावून भुंकायचा, असं कसं तुम्ही घर विसरलात म्हणून? मग गल्लीमध्ये जाताच पुन्हा वेगळा आवाज करून आनंद व्यक्त करायचा. गल्लीतल्या इतर कुत्र्यांना जर आम्ही रागावलो तर तो आमच्यावर रागावून भुंकायचा.
पाळीव प्राणी stress-buster आहेत असं म्हणतात, ते अगदी खरं आहे. दुःख, थकवा, आजारपण गोल्डीला पाहून पळायचं. गाडीतून फिरायला त्याला खूपच आवडायचं. “चल गोल्डी गाडीतून फिरून येऊ” म्हटलं की तिरपा काम करून ऐकायचा. खरंच आपल्याला फिरायला नेतात की नाही, याची खात्री करून घ्यायचा. काही काळ एक मांजरही आमच्या घरी होती. हा तिला खूप प्रेमाने खेळवायचा. तिलाही बरं वाटत असावं, पण एखाद्यावेळी अति झालं की ती गोल्डीवर पंजा उगारायची.
शेवटचा एक महिना गोल्डी खूप आजारी होता. त्याच्या किडन्या फेल झाल्या होत्या. बहुतेक पाळीव कुत्री किडनी फेल्यूअरने मरतात, कारण ते युरीन होल्ड करून दिवसभर ठेवतात आणि आपण जेव्हा फिरायला नेऊ तेव्हाच ते शि-सू करतात.
आमचे व्हेटर्नरी डॉक्टर अतिशय तज्ञ होते. औषधे, सलाईन, दिवसातून दोनदा येणं, असे सगळे उपचार केले, पण त्या कशालाही तो दाद देत नव्हता. आम्ही दोन महिने कुठेही गेलो नाही. शेवटी तर त्याचा हात हातात घेऊन आमच्यापैकी कोणीतरी सतत त्याच्याजवळ बसत असे.
२९ डिसेंबर २०२२ ला तो गेला. एक ऋणानुबंध संपला. जाताना त्याच्या डोळ्यातले अश्रू बरंच काही सांगून गेले.
– माधुरी साकुळकर
नागपूर