अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाचा खुलासा; फोर्टीफाईड तांदुळ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी
जालना, दि.30 (जिमाका) : सध्या स्वस्त दुकानातील तांदळात प्लॅस्टिकचे तांदुळ मिळत असल्याच्या अपप्रचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मात्र रेशनिंग दुकानातुन मिळणारा तांदुळ हा फोर्टीफाईड तांदुळ आहे. केंद्र शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत हा तांदुळ वितरीत केला जात असून, तो आरोग्यासाठी अपायकारक नसून अत्यंत लाभदायी आहे, असा खुलासा अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी दिली आहे.
स्वस्त दुकानातून घरी आणलेला तांदुळ पाण्यावर तरंगत असल्याने तो प्लॅस्टिकचा आहे. अशी चर्चा ग्राहकांमध्ये सुरु आहे. ग्राहकांमध्ये असलेला हा गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण देत फोर्टीफाईड तांदळाचे महत्त्व सांगितले की, हा तांदुळ अधिक पौष्टिक असून शरिरास आवश्यक पोषण तत्वांची पुर्तता हा फोर्टीफाईड तांदुळ करतो. शरीरात पोषक तत्वांचे घटक कमी असतील तर फोर्टीफाईड तांदुळ खाल्ल्याने पोषण तत्वांची कमतरता दुर करण्यास मदत मिळेल. फोर्टीफाईड तांदळामध्ये यॅलेसेमिया, सिकलसेल, अॅनिमिया असे आजार रोखण्याचे गुणधर्म आहेत. फोर्टीफाईड तांदळामध्ये लोह, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी-12 चे सूक्ष्म अन्नद्रव्य असून आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असा आहे. असेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चौधर यांनी सांगितले आहे.
वजनाला हलका असल्याने हा तांदुळ पाण्यावर तरंगत असतो. फोर्टीफाईड तांदळाबाबत लाभार्थ्यास शंका असल्यास त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा. फोर्टीफाईड तांदुळ हा तांदळाच्या पिठापासुन बनलेले असतात. ज्यात आरोग्यासाठी आवश्यक सुक्ष्म पोषक घटक असतात. बी-12 सुक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण केले जाते. या मिश्रणाला पुन्हा तांदळाचा आकार दिला जातो. यालाच फोर्टीफाईड तांदुळ म्हणतात. लाभार्थ्यांनी फोर्टीफाईड तांदळाबाबत होत असलेला अपप्रचार, अफवा व खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू येऊ नये, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.