जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातएकुण 16 लाख 52 हजार 511 मतदार
जालना, (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या पार्श्वभूमिवर दि.1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत दि.29 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम यादीनुसार जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात पुरुष 8 लाख 60 हजार, स्त्री 7 लाख 92 हजार आणि तृतीयपंथी 42 मतदार अशी जिल्ह्यात अंतिम एकुण 16 लाख 52 हजार 511 मतदारांची संख्या आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
दि.1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत दि.29 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात सैन्य दलातील पुरुष 1 हजार 531 तर स्त्री 31 असे एकुण 1 हजार 562 मतदार आहेत. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात 18 ते 19 वयोगटातील पुरुष 25 हजार 489 तर स्त्री 15 हजार 565 आणि तृतीयपंथी 2 असे एकुण 41 हजार 56 उमेदवार आहेत. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात पुरुष 8 हजार 187 व स्त्री 5 हजार 465 असे एकुण 13 हजार 652 दिव्यांग मतदार आहेत. तर वय वर्षे 85 पेक्षा अधिक असलेले एकुण 27 हजार 287 मतदार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील मतदार संघातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे तसेच ज्या ठिकाणी 1500 पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात येवून नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. यानुसार जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात एकुण 1755 मतदान केंद्र आहेत.