Mahila Sanvad News in Jalna

रविवारी शिक्षक पात्रता परीक्षेचे दोन सत्रात आयोजन

रविवारी शिक्षक पात्रता परीक्षेचे दोन सत्रात आयोजन

 जालना, दि.7 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून प्राथमिक शिक्षक पदासाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे जालना येथे रविवार दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा पेपर-1 साठी सकाळी 10.30 ते 1 यावेळेत 10 परीक्षा केंद्रावर तर पेपर-2 चे दुपारी 2.30 ते 5 या वेळेत 11 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.  तरी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी परीक्षार्थींनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शिक्षक पात्रता परीक्षा जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व सनियंत्रण  समिती उपाध्यक्ष वर्षा मिना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा जालना येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, श्री.सरस्वती भूवन प्रशाला, सी.टी.एम.के. गुजराथी विद्यालय, राष्ट्रीय हिंदी विद्यालय, आर.एच.व्ही. इंग्लिश स्कुल, सेंट मेरीज हायस्कुल, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, नवयुवक गणेश प्राथमिक विद्यालय, एस.एम.एस. जैन हायस्कुल, रेयॉन इंटरनॅशनल स्कुल आणि जे.ई.एस. महाविद्यालय अशा एकुण 11 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

 सकाळच्या सत्रात पेपर-1 साठी 2 हजार 930 तर दुपारच्य सत्रात पेपर-2 साठी 3 हजार 237 उमेदवार परीक्षेला बसलेले आहेत. उमेदवारांना सकाळच्या सत्रात 9 ते 10.10 दरम्यान तर दुपारच्या सत्रात 1 ते 2.10 वाजेपर्यंत कालावधीत प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व परीक्षा केंद्रातील हॉलमध्ये परिषदेने सीसीटिव्ही कॅमेरे लावलेले आहेत. तसेच जिल्हास्तरावर परीक्षा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून याद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक जिल्हा परिक्षक म्हणून उपशिक्षणाधिकारी शाम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी परिक्षार्थींनी स्वत: जवळ कोणत्याही प्रकारचे ईलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगू नये. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *