Mahila Sanvad News in Jalna

शिंदे गटाची बी टीम ओळखा – आ.कैलास गोरंटयाल

शिंदे गटाची बी टीम ओळखा – आ.कैलास गोरंटयाल
येत्या २० नोव्हेंबर रोजी होत असलेली निवडणूक ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे
महायुतीच्या उमेदवाराला मदत होईल यासाठी काही जण निवडणूक लढवत आहेत. मात्र, अशा उमेदवारांना थारा न देता महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंटयाल यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन प्रसिद्ध शायर खा. इमरान प्रतापगडी यांनी काल सोमवारी येथे बोलतांना केले.
जालना विधानसभा मतदार संघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास गोरंटयाल यांच्या प्रचारार्थ जुना जालना भागातील मनपाच्या स्व.कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलावर काल सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या विशाल जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार कैलास गोरंटयाल यांच्यासह पक्षाचे लोकसभा प्रभारी माजी मंत्री डॉ. पी.सी.शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, अंकुशराव राऊत, जगदीश्वर राव, राजेंद्र राख, खान, अब्दुल रफीक, रिपाईचे जिल्हाध्यक्ष किशोर मघाडे, आपचे संजोग हिवाळे, सपाचे जिल्हाध्यक्ष शेख नबी शिपोरकर, दिनकर घेवंदे, मुस्तकीन हमदुले, राजेंद्र जाधव, मधुकर घेवंदे, अतीक खान आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना खा. इमरान प्रतापगडी म्हणाले की, एकीकडे जाती – धर्मात तेढ निर्माण प्रयत्न होत असतांना दुसरीकडे देशाला जोडण्याचे काम सुरू असून दोन विचारांची ही लढाई आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ आमदार निवडून देण्यापूर्ती मर्यादित नसून राज्याच्या सत्तेत कुणाला बसवायचे याबाबतचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा देणाऱ्यांना आपल्या सर्वांच्या एकोप्यामुळे २४० वर थांबावे लागले असून अशीच एकी येत्या विधानसभा निवडणुकीत दाखवा असे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही एका समाजाच्या मतांवर आमदार होणं शक्य नाही.जे कुणी आमदारकीचे स्वप्न मनात ठेवून निवडणूक लढवत आहेत त्यांना मतदान केले तर आपल्या मतांचे विभाजन होऊन त्याचा लाभ हा अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या उमेदवाराला होणार आहे. त्यामुळे सर्वांनी जागृत राहून मत विभाजनाची ही खेळी हाणून पाडत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करून खा. इमरान प्रतापगडी यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर आपल्या भाषणातून खास शैलीत टीकेची तोफ डागली. तत्पूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, एकबाल पाशा,अब्दुल रफीक, अब्दुल रउफ परसुवाले, अकबर खान, किशोर मघाडे, वाजेद पठाण, आमेर पाशा, नजीब लोहार, फारुख तुंडीवाले,अमजद खान, आरेफ खान, शेख फारुख आदींनी आपल्या भाषणातून मविआ उमेदवार कैलास गोरंटयाल यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून जे आज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांनी मुस्लिम समाजाच्या हितासाठी काय काम केले असा सवाल उपस्थित करत मतांचे विभाजन टाळण्याचे आवाहन उपस्थीत समाज बांधवांना केले.
————————————
गोरंटयाल यांचे कर्ज फेडण्याची संधी गमावू नका – खा. प्रतापगडी
महाराष्ट्राशी आपले नाते असल्याने काँग्रेस पक्षाचे नेते खा.राहुल गांधी यांनी आपल्याला या राज्यातून राज्यसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत एका एका मतांसाठी मोठी आर्थिक उलाढाल झाली. जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी पहिले मतदान आपले राहील असे सांगून आपल्याला विजयाची खात्री दिली होती. त्यामुळे गोरंटयाल यांचे कर्ज फेडण्यासाठी आपण जालन्यात आलो आहे.आपण प्रथमच जालन्यात आलो असलो तरी ही शेवटची वेळ नक्की नाही. गोरंटयाल यांना विजयी करा, यावेळी त्यांना मंत्रीपदाची संधी असून मंत्री झाल्यानंतर आपण पुन्हा त्यांच्यासोबत जालना येथे येणार असल्याचे खा.प्रतापगडी शेवटी म्हणाले.
————————————–
शिंदे गटाची बी टीम ओळखा – आ.कैलास गोरंटयाल
जालन्यात आपण पराभूत होऊ शकत नाही याचा अंदाज आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला आला आहे. पायाखालची वाळू सरकु लागल्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्याची खेळी  आखली असून त्यांनी शिंदे गटाची बी टीम निवडणूक रिंगणात उतरवून दोन उमेदवार उभे केले आहेत असा आरोप मविआचे उमेदवार आ.कैलास गोरंटयाल यांनी केला आहे. शिंदे गटाच्या बी टीमचे उमेदवार कोण आहेत ही बाब सर्वांना माहीत असून मतांचे विभाजन करून विजयाचा मार्ग मोकळा करण्याचा आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या प्रयत्न जागरूक मतदार निश्चितपणे हाणून पाडतील आणि आपल्याला मोठया मतांनी विजयी करतील असा विश्वास व्यक्त करून गोरंटयाल यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. भविष्यात शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा करण्याबरोबरच जालन्यासाठी एक विद्यापीठ देखील मंजूर करून आणणार असल्याची ग्वाही उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *