परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंगरूमची निवडणूक निरीक्षक श्री. नवीन यांच्याकडून पाहणी
जालना, दि.१३(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक श्री. नवीन यांनी जिल्ह्यातील ९९-परतूर विधानसभा मतदारसंघ आणि १००-घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँगरूमला भेट देऊन पाहणी करत विविध सूचना केल्या.
यावेळी अंबा-परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील स्ट्रॉंगरूम पाहणीच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी पद्माकर गायकवाड, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे, यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक श्री.नवीन यांनी विधानसभा निवडणूकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राची व साहित्याची सिलिंग कर्मचारी करत असताना प्रत्यक्ष टेबलावर जाऊन कामाची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या.
घनसावंगी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्रॉंगरूम पाहणी करताना निवडणूक निरीक्षक श्री.नवीन यांच्यासह जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, प्रशिक्षणार्थी आयएएस श्री.अरुण, निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी मतदान यंत्रावर प्रत्यक्ष मतदान करून मतदान यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री काही कर्मचारी करत असताना निवडणूक निरीक्षक श्री.नवीन आणि जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी
प्रत्यक्ष टेबलवर जाऊन मॉकपोल करत व्हीव्हीपँट मधील दिसणाऱ्या उमेदवारांच्या चिन्हांची पडताळणी केली. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दांडगे यांच्याकडून निवडणूक विषयक कामाचा आढावा घेतला.