विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मतदान केंद्रावरील निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण 1,755 मतदान केंद्रावर 7,917 अधिकारी यांची नियुक्ती
जालना,दि.18,(जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रावर जाणाऱ्या निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ (रॅन्डोमायझेशन) प्रक्रिया आज (दि. 18) रोजी भारत निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडण्यात आली. या प्रक्रियेनुसार, कोणत्या मतदान केंद्रावर कोणते पथक जाईल, हे मतदानाच्या एक दिवसापूर्वी म्हणजे दि. 19 नोव्हेंबर, 2024 रोजी संबंधित पथकांना कळविण्यात येणार आहे.
यावेळी निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र आणि श्री. नवीन, जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, उप जिल्हा निवडणुक अधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे आणि जिल्हा सूचना अधिकारी रविंद्र पडूळकर यांची उपस्थिती होती.
आज पार पडलेल्या सरमिसळ प्रक्रियेत जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील 1 हजार 755 मतदान केंद्रासाठी 1 हजार 954 टिम (राखीवसह), तर 7 हजार 816 अधिकारी-कर्मचारी यांची नेमणुक केली असुन, 101 सुक्ष्म निरीक्षक (राखीवसह) असे एकुण 7 हजार 917 (राखीवसह) अधिकारी-कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बुधवार, 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळत होणार आहे. यापूर्वी सरमिसळ प्रकियेने प्रत्येक मतदारसंघनिहाय मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले असून, मतदान पथकांना दोन प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. आज पार पडलेल्या तिसऱ्या सरमिसळ प्रक्रियेने कोणत्या मतदान पथकाला कोणते मतदान केंद्र मिळणार आहे, ते निश्चित झाले आहे. सामान्य निवडणूक निरीक्षक यांच्या स्वाक्षरीने सदर माहिती सीलबंद लिफाफामध्ये टाकून प्रत्येक विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी हे प्रत्येक पथकांना मिळालेल्या मतदान केंद्राबाबत माहिती देऊन मतदानाचे संपूर्ण साहित्य घेवून मतदान केंद्रावर रवाना करणार आहेत.