विधानसभा निवडणूकीसाठी वॉर रुम सज्ज
जालना,दि.19,(जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज (दि.20) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील 991 मतदान केंद्रावर बाहेर आणि आत मध्ये 1 हजार 982 वेब कास्टींग कॅमेरे बसविण्यात आले आहे. या वेब कॅमेऱ्याद्वारे जिल्हा निवडणूक विभाग हे जालना शहरातील सर्व मतदान केंद्रावरील सर्व हालीचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. वेबकास्टिंग करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर मतदारांच्या मतदान गोपनियतेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने एक कॅमेरा बसविण्यात आली आहे. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने केंद्रावर मतदान सुरू होण्यापासून संपेपर्यंतच्या सर्व हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रात सुरू असलेली मतदान प्रक्रिया, मतदान केंद्रावरील उपलब्ध सोयीसुविधा आदीवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून निवडणूक विभाग लक्ष ठेवणार आहे. वेब कास्टींद्वारे होणारे चित्रण थेट निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्य निवडणूक आयोग, भारत निवडणूक आयोग यांना देखील पाहता येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.
या करीता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियंत्रण कक्ष (वॉर रुम) स्थापन करण्यात आली असून, जालना जिल्ह्यातील 991 मतदान केंद्रावर वेबकास्टींगद्वारे मतदान केंद्रावर करडी नजर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती दिली आहे.