Mahila Sanvad News in Jalna

जिल्हा प्रशासन आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने घनसावंगी येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन

जिल्हा प्रशासन आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने घनसावंगी येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन

नागरिकांनी महामेळाव्याचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते यांचे आवाहन

जालना, दि.14(जिमाका) : नागरिकांना विविध शासकीय योजना व विधी सेवांबाबतची माहिती व लाभ देण्यासाठी जालना जिल्हा प्रशासन आणि जालना विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा. एम. मोहिते यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, कायदे विषयक विविध कल्याणकारी योजना, गुन्ह्यातील पिडीत व्यक्तींसाठी नुकसान भरपाईच्या योजना आणि मोफत कायदे विषयक सल्ला देण्यासाठी जालना जिल्हा प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 15 डिसेंबर, 2024 रोजी आयटीआय, घनसावंगी, जि. जालना येथे सकाळी 10:30 वा. विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा आणि योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जालना जिल्हा पालक न्यायमुर्ती संदीपकुमार सी. मोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलीस अधिक्षक अजयकुमार बसंल, जालना जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲङ बाबासाहेब इंगळे, जालना जिल्हा वकील संघाचे ॲङ विकास टी. पिसुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या महामेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी. तसेच कायदेविषयक जनजागृती व्हावी, याकरिता न्यायालय, महसुल, पंचायत, कृषी, नगर प्रशासन, पोलीस, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, महिला अर्थिक विकास महामंडळ, महिला बाल विकास विभाग, समाज कल्याण जिल्हा परिषद, पंतप्रधान स्वनीधी योजना, आरोग्य विभाग, सामाजिक संस्था आदी अशा प्रकारचे विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स या महामेळाव्यात उभारण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा. एम. मोहिते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रणिता भारसाकडे-वाघ, उपजिल्हाधिकारी (सा.) तथा अंबड उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, घनसावंगी तालूका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर सी.एस जगताप, घनसावंगी वकील संघाचे अध्यक्ष ॲङ दिपक शिवतारे यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *